Genesis 41

1साधारणपणे दोन वर्षे पूर्ण झाल्यानंतर फारो राजाला स्वप्न पडले. ते असे की, पाहा तो नाईल नदीच्या काठी उभा राहिला होता. 2तेव्हा पाहा, त्याने सात गाई नाईल नदीतून बाहेर येताना पाहिल्या. त्या धुष्टपुष्ट व सुंदर होत्या. त्या तेथे उभ्या राहून गवतात चरत होत्या. 3त्यानंतर आणखी सात रोड व अंगाने कुरुप गाई नदीतून बाहेर आल्या व नदीच्या किनारी त्या सात धष्टपुष्ट व सुंदर गाईंच्या बाजूला उभ्या राहिल्या.

4आणि त्या सात दुबळ्या व कुरुप गाईंनी त्या सात सुंदर व धष्टपुष्ट गाईंना खाऊन टाकले. त्यानंतर फारो राजा जागा झाला. 5मग फारो राजा पुन्हा झोपल्यावर त्याला दुसऱ्यांदा स्वप्न पडले. त्यात त्याने पाहिले की, एकाच ताटाला सात भरदार कणसे आली. 6त्यानंतर पाहा, त्या ताटाला सात खुरटलेली व पूर्वेच्या वाऱ्याने करपलेली अशी सात कणसे आली.

7नंतर त्या सात खुरटलेल्या व करपलेल्या कणसांनी ती सात चांगली व टपोऱ्या दाण्यांची भरदार कणसे गिळून टाकली. तेव्हा फारो पुन्हा जागा झाला आणि ते तर स्वप्न असल्याचे त्याला समजले. 8दुसऱ्या दिवशी सकाळ झाल्यावर फारो राजा त्या स्वप्नांमुळे चिंतेत पडून बेचैन झाला. त्याने मिसरातील जादूगार व ज्ञान्यांना बोलावले. फारोने आपली स्वप्ने त्यांना सांगितली. परंतु त्यांच्यातील कोणालाच त्या स्वप्नांचा अर्थ सांगता आला नाही.

9तेव्हा प्यालेबरदार फारोस म्हणाला, “आज मला माझ्या अपराधाची आठवण होत आहे. 10फारो, आपण माझ्यावर व आचाऱ्यावर संतापला होता आणि आपण आम्हांस पहारेकऱ्यांच्या सरदाराच्या वाड्यातील तुरुंगात टाकले होते. 11तेव्हा तुरुंगात असताना एकाच रात्री मला व त्याला, आम्हा दोघांना स्वप्ने पडली. आम्हांला लागू होतील अशी निरनिराळी स्वप्ने आम्हांला पडली.

12तेथे कोणी इब्री तरुण आमच्याबरोबर कैदेत होता. तो संरक्षण दलाच्या सरदाराचा दास होता. त्याला आम्ही आमची स्वप्ने सांगितली त्याने त्याचे स्पष्टीकरण केले. त्याने आमच्या प्रत्येकाच्या स्वप्नांचा अर्थ सांगितला. 13आणि त्याने सांगितलेल्या अर्थाप्रमाणे तसे ते घडले. तो म्हणाला, फारो तुला पूर्वीप्रमाणे कामावर पुन्हा घेईल आणि परंतु दुसऱ्याला फाशी देईल.”

14मग फारोने योसेफाला बोलावणे पाठवले. तेव्हा त्यांनी त्याला ताबडतोब तुरुंगातून बाहेर आणले. योसेफ दाढी करून व कपडे बदलून फारोकडे आला. 15मग फारो योसेफास म्हणाला, “मला स्वप्न पडले आहे, परंतु त्याचा अर्थ सांगणारा कोणी नाही. मी तुझ्याविषयी ऐकले की, जेव्हा कोणी तुला स्वप्न सांगतो तेव्हा तू स्वप्नांचा अर्थ सांगतोस.” 16योसेफाने फारोला उत्तर देऊन म्हणाला, “तसे सामर्थ्य माझ्यामध्ये नाही. देवच फारोला स्वप्नांचा अर्थ सांगेल.”

17मग फारो योसेफाला म्हणाला, “माझ्या स्वप्नामध्ये मी नाईल नदीच्या काठी उभा होतो. 18तेव्हा पाहा नदीतून सात धष्टपुष्ट व सुंदर गाई बाहेर आल्या व गवत खाऊ लागल्या असे मी पाहिले.

19त्यानंतर पाहा, सात रोड व कुरुप गाई वर आल्या. मी सबंध मिसर देशात त्यांच्यासारख्या बेढब गाई कधीच पाहिल्या नव्हत्या. 20त्या रोड व कुरुप गाईनी आधीच्या धष्टपुष्ट व सुंदर गाई गिळून टाकल्या. 21तरीही त्या रोड व कुरुपच राहिल्या, त्यांच्याकडे पाहिल्यावर त्यांनी त्या सात गाई गिळून टाकल्या असे वाटत नव्हते, त्या पूर्वीइतक्याच अशक्त व रोड दिसत होत्या मग मी जागा झालो.

22त्यानंतर माझ्या दुसऱ्या स्वप्नात एकाच ताटाला सात चांगली भरदार व टपोऱ्या दाण्यांची भरगच्च कणसे आली, 23मग त्यांच्या मागून त्या ताटाला आणखी दुसरी वाळलेली, बारीक व पूर्वेच्या गरम वाऱ्याच्या झळयांमुळे करपलेली सात कणसे आली. 24बारीक कणसांनी ती चांगली सात कणसे गिळून टाकली. ही माझी स्वप्ने मी माझ्या जादुगारांना सांगितली. परंतु त्यांच्यातील कोणालाही त्यांचा उलगडा करून सांगता आले नाही.

25मग योसेफ फारोला म्हणाला, “महाराज, ह्या दोन्हीही स्वप्नांचा अर्थ एकच आहे. देव जे काही करणार आहे ते त्याने आपणांस कळविले आहे. 26त्या सात चांगल्या गाई आणि ती सात चांगली कणसे म्हणजे सात चांगली वर्षे आहेत. स्वप्ने सारखीच आहेत.

27त्या दुसऱ्या सात रोडक्या गाई व ती सात सुकलेली व पूर्वेच्या वऱ्याने करपलेली कणसेही म्हणजे अवघ्या देशावर येणाऱ्या दुष्काळाची सात वर्षे आहेत. 28जी गोष्ट मी फारोला सांगितली ती हीच आहे. जे काय घडणार आहे हे देवाने आपणास दाखवले आहे. 29पाहा सर्व मिसर देशात सात वर्षांच्या सुबत्तेच्या काळात चांगले व भरपूर पीक येईल.

30परंतु सुकाळाच्या सात वर्षांनंतर सर्व देशभर दुष्काळाची अशी सात वर्षे येतील की, त्यामुळे मिसर देशाला सुकाळाचा विसर पडेल आणि हा दुष्काळ देशाचा नाश करील. 31आणि भरपूर धान्य असतानाचे दिवस देशात कसे होते याचा लोकांना विसर पडेल, कारण तो फार भयंकर काळ असेल. 32तेव्हा फारो महाराज, एकाच गोष्टीविषयी आपणाला दोनदा स्वप्ने पडली, ती यासाठी की, देव हे सर्व लवकरच व नक्की घडवून आणील हे आपणास दाखवावे.

33तेव्हा, फारोने एखाद्या समंजस व शहाण्या मनुष्याची निवड करून त्याला सर्व मिसर देशावर नेमावे. 34फारोने हे करावे : देशावर देखरेख करणारे नेमावे. त्यांनी येत्या सात वर्षांच्या सुकाळात मिसरातल्या पिकाचा पाचवा हिस्सा गोळा करून घ्यावा.

35अशा रीतीने ही जी येणारी चांगली वर्षे, त्यांत सर्व अन्नधान्य गोळा करावे. फारोच्या अधिकाराखाली ते धान्य नगरांमध्ये साठवून ठेवावे. त्यांनी त्याची राखण करावी. 36येणाऱ्या दुष्काळातील सात वर्षांच्या काळात त्या धान्याचा पुरवठा मिसर देशाला करावा. अशा प्रकारे मग दुष्काळाच्या सात वर्षांत देशाचा नाश होणार नाही.”

37हा सल्ला फारो राजाच्या दृष्टीने व त्याच्या सर्व सेवकांच्या दृष्टीने चांगला वाटला. 38फारो त्याच्या सेवकांना म्हणाला, “देवाचा आत्मा ज्याच्यात आहे असा, ह्याच्यापेक्षा अधिक चांगला व योग्य असा दुसरा कोणी मनुष्य सापडेल काय?”

39तेव्हा फारो योसेफास म्हणाला, “देवाने तुला या सर्व गोष्टी दाखवल्या आहेत, म्हणून तुझ्यासारखा समंजस व शहाणा दुसरा कोणी नाही. 40तू माझ्या घराचा अधिकारी हो आणि तुझ्या शब्दाप्रमाणे माझे सर्व लोक चालतील. या देशात केवळ राजासनापुरता म्हणून काय तो मी तुझ्यापेक्षा मोठा असेन.” 41मग फारो योसेफास म्हणाला, “मी तुला सर्व मिसर देशावर नेमले आहे.”

42मग फारोने राजमुद्रा असलेली आपल्या बोटातील अंगठी योसेफाच्या बोटात घातली; तलम तागाच्या वस्त्राचा पोशाख त्याला घातला आणि त्याच्या गळ्यात एक सोन्याची साखळी घातली. 43नंतर त्याने त्याला आपल्या दुसऱ्या रथात बसवले. लोक त्याच्यापुढे आरोळी देत चालले “गुडघे टेका.” फारोने त्याला सर्व देशावर नेमले.

44फारो योसेफाला म्हणाला, “मी फारो आहे, आणि सर्व मिसर देशात तुझ्या हुकुमाशिवाय कोणी आपला हात किंवा पाय हलवू शकणार नाही.” 45फारोने योसेफाला “सापनाथ-पानेह” असे दुसरे नाव दिले. फारोने ओनचा याजक पोटीफरा याची मुलगी आसनथ ही योसेफाला बायको करून दिली. योसेफ सर्व मिसर देशावर अधिकारी झाला.

46योसेफ मिसर देशाचा राजा फारो याची सेवा करू लागला तेव्हा तो तीस वर्षांचा होता. योसेफाने मिसर देशभर दौरा करून देशाची पाहणी केली. 47सुकाळाच्या सात वर्षांत सर्व देशभर भरपूर पीक आले.

48योसेफाने सुकाळाच्या सात वर्षांत अन्नधान्य गोळा करून नगरोनगरी साठवून ठेवले. त्याने प्रत्येक नगराभोवतालच्या शेतातले अन्नधान्य त्यामध्येच साठवून ठेवले. 49योसेफाने जणू काय समुद्राच्या वाळूप्रमाणे अन्नधान्य गोळा करून साठवून ठेवले. ते इतके होते की, त्याने मोजणे सोडले कारण ते मोजमाप करता येत नव्हते.

50दुष्काळ येण्यापूर्वी योसेफाला, आसनथ जी ओनचा याजक पोटीफरा याची मुलगी तिच्या पोटी दोन मुलगे झाले. 51योसेफाने पाहिल्या मुलाचे नाव मनश्शे ठेवले.कारण तो म्हणाला, “देवाने, मला झालेल्या सर्व कष्टांचा व तसेच माझ्या बापाच्या घराचा विसर पडू दिला.” 52त्याने दुसऱ्या मुलाचे नाव एफ्राईम असे ठेवले, कारण तो म्हणाला, “माझ्या दुःखाच्या भूमीमध्ये देवाने मला सर्व बाबतींत सफल केले.”

53मिसरमध्ये असलेली भरपुरीची, सुबत्तेची सात वर्षे संपली. 54सात वर्षांनंतर अगदी योसेफाने सांगितल्याप्रमाणे दुष्काळ पडण्यास सुरुवात झाली. सर्व देशांमध्ये दुष्काळ पडला होता, परंतु मिसरमध्ये मात्र अन्न होते.

55दुष्काळ पडण्यास सुरुवात झाली, तेव्हा लोकांनी अन्नासाठी फारोकडे ओरड केली. तेव्हा फारो मिसरच्या सर्व लोकांना म्हणाला, “योसेफाला विचारा व तो सांगले ते करा.” 56संपूर्ण देशामध्ये दुष्काळ पडला होता. योसेफाने सर्व गोदामे उघडली आणि मिसरच्या लोकांना धान्य विकत दिले. मिसरमध्ये फार कडक दुष्काळ पडला होता. सर्व पृथ्वीवरील देशांतून लोक धान्य विकत घेण्यासाठी योसेफाकडे येऊ लागले, कारण त्या वेळी पृथ्वीच्या सर्व भागांत दुष्काळ पडला होता.

57

Copyright information for MarULB